"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Sunday, March 3, 2024

संत गजानन महाराज


गण गण गणात बोते....🚩

समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रगटदिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!! 

‼️अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव-निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय‼️

 माघ कृष्ण पक्ष सप्तमी श्री अंनत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्रीगुरू गजानन महाराज शेगांव निवासी यांचा प्रकटदिन...

"कोण हा कोठीचा काहीच कळेना | 

ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | 

साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति | 

आलीसे प्रचिती बहुतांना ||" 

श्री गजानन महाराज प्रकट दिन संपूर्ण माहिती...

गण गण गणात बोते....🚩


     माघ कृष्ण पक्ष सप्तमी श्री अंनत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्रीगुरू गजानन महाराज शेगांव निवासी यांचा प्रकटदिन आहे...

      महाराष्ट्रातील बहुतांश भक्तपरिवार हा श्रीविठ्ठलसंप्रदाय आणि श्रीदत्तसंप्रदाय यांमध्ये विभागलेला आढळतो. बहुसंख्य लोकांचा ओढाही याच दोन संप्रदायांकडे असलेला दिसेल. श्रीदत्त संप्रदायामध्ये स्वामीसमर्थ अक्कलकोटकर ' श्रीदत्तावतार ' म्हणून प्रसिद्ध आहेत आणि अधिक बारकाईने अभ्यास केल्यास महाराष्ट्रातील बऱ्याचशा संत - सत्पुरूषांचे मूळस्थान स्वामी समर्थांपाशी येऊन थांबते. श्री गजानन महाराजांविषयी श्री देवमामलेदार यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की, शेगांव येथे प्रकट होण्यापूर्वी महाराज अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे काही दिवस मुक्कामास होते.

       स्वामीसमर्थांनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरूष श्रीदेव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्म विषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले. त्यांच्याच सूचनेनुसार महाराजांनी इगतपुरीजवळील मुकना नाल्यापाशी असलेल्या कपिलधारा तीर्थावर तप केले आणि पुढे आपले कार्यक्षेत्र शेगांव येथे निश्चित केले.


    स्वामी समर्थांचा संबंध आणखी एका कारणाने महत्त्वाचा मानला जातो. १८७८ साली स्वामी समर्थ अक्कलकोट येथे समाधिस्थ झाले आणि त्याचवर्षी गजानन महाराज शेगांव येथे प्रकट झाले. त्यामुळे श्रीगजानन महाराज हे स्वामी समर्थ संप्रदायातील एक महत्त्वाचे सत्पुरूष होते , हे नि:संशय. त्यांचा हा प्रकटदिन शेगांवमध्ये उत्साहात साजरा केला जातो. महाराजांचे भक्त आज देशभरच नव्हे तर परदेशातही पसरलेले आढळतात. ते हा प्रकटदिन भक्ति भावाने साजरा करतात.


       श्री महाराज कोण होते, कोठून आले. महाराज कोण होते, कोठून आले, ब्राह्मण होते (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करित, तसेच वेदश्रवणदेखिल त्यांना फार आवडे) किंवा नव्हते ह्या गोष्टींवर बराच वाद चालतो.  माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगाव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. 


ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, 


"कोण हा कोठीचा काहीच कळेना | 

ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | 

साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति | 

आलीसे प्रचिती बहुतांना ||" 


     जसा कुशल जवाहिर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, 


"दंड गर्दन पिळदार| भव्य छाती दृषि स्थिर| भृकुटी ठायी झाली असे||" 


      जेव्हा बंकटलालाने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलिकडील स्थितिस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहज समाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. तत्काळ महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची मनोमन खात्री पटली. महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास. ह्या उक्तिप्रमाणे, 

"बंकटलालाचे घर| झाले असे पंढरपूर|

लांबलांबूनीया दर्शनास येती| लोक ते पावती समाधान||" 


     बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून् गेले. सद्‌गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्‌गुरू होते. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार महाराजांनी नाशिकजवळील कपिलधारा तीर्थाजवळील घनघोर जंगलात बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली व परमोच्च स्थितिस प्राप्त झाले. त्यावर असे सांगितले जाते की स्वामी समर्थांनी त्यांना नाशिकच्या देव मामलेदार (हे देखिल स्वामी समर्थांच्या श्रेष्ठ शिष्यांपैकी एक होते) ह्यांच्याकडे पाठविले. त्यांच्याकडे काही काळ राहून महाराज जगदोध्दाराकरिता शेगावला आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले.

     शेगांव येथे प्रकट होण्यापूर्वी महाराज अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे काही दिवस मुक्कामास होते. स्वामीसमर्थांनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरूष श्रीदेव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्म विषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले . त्यांच्याच सूचने नुसार पुढे आपले कार्यक्षेत्र शेगांव येथे निश्चित केले.


    "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणे बुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे,

 


"मना समजे नित्य|जीव हा ब्रह्मास सत्य|

मानू नको तयाप्रत|निराळा त्या तोची असे||" 


ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.


        ★ शरीरयष्टी -

   सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी , रापलेला तांबूस वर्ण , तुरळक दाढी व केस , वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देहचर्या . लांब लांब पावले टाकीत सदानकदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती , पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व त्यास छापी (कपडा) गुंडाळलेली .


      ★अन्न सेवन -

   महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी बालसुलभ वृत्ती .


    महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो , प्रसन्नभावाने त्याचेही सेवन करावे. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाड्याची भाजी, पिठलं असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्‍यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठलं आणि अंबाड्याची भाजी अवश्य करितात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे , नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी .


     मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत.


  ★ लोकमान्य टिळकांना कैदेबद्दल भविष्यवाणी -

    लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंती संदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. जेव्हा लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी कोल्हटकरांच्या हातून त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे तसेच त्यांना खूप दूरही जावे लागेल, परंतु ते तुरुंगात मोठी कामगिरी करणार आहेत. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली. 


"गीतेचा अर्थ कर्मपर| लावी बाळ गंगाधर| 

त्या टिळकांचा अधिकार| वानाया मी समर्थ नसे,

🔵🟢🟣

         ★ समाधि -

   एके दिवशी ही वेडगळ भिकारीण मेल्याचे वृत्त मठात आले. ते ऐकताच महाराजांच्या डोळ्यांना अश्रृधारा लागल्या. तीन दिवस महाराजांनी शोक केला. त्यांची ही कृती सर्वांना अगम्य वाटली. महाराजांनी जातीपातीचा, उच्चनीचतेचा, भेदभावाचा धर्म अंगीकारला नसल्याने प्रत्येकास त्यांच्या दर्शनास येण्याची मुभा होती. शेगांवातल्या एका वेश्येच्या ओसरीवर बसून महाराज तिच्या हातची भाकरी खात. तिला महाराज म्हणत, ' तू महानंदा आहेस.'


     १९१० साली महाराज समाधिस्थ झाले तेव्हा असे म्हणतात की, शिर्डी येथे श्रीसाईबाबांनी आकांत मांडला. दिवसभर मौन बाळगून असलेल्या साईबाबांनी ' माझा भाऊ चालला ' असे कळवळून उद्गार काढले आहे. आज महाराजांचा प्रकटदिन सर्वत्र उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जात आहे. या अवलिया संताचा भक्तगण वाढत आहे. या अवलियाला माझे वंदन .


    जेव्हा महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला.


     लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करुन मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलिन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. लोकांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रुंचा पूर लोटला.


    त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणूकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारीत रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला


   त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, 


  "जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||" 


    आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. 

    अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे, 

"अगा! निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | 

अगा! निर्मला, केवला आनंदकंदा || 

स्थिरचररुपी नटसी जगी या | 

नमस्कार माझा तुला गुरुराया ||१|| 

अगा! अलक्षा, अनामा, अरुपा | 

अगा! निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा || 

कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या | 

नमस्कार माझा तुला गुरुराया ||२||" 


    सदगुरुच्या स्वरुपाचे खरे वर्णन ह्या ओळींमध्ये सामावलेले आहे, महाराजांना हे वर्णन किती चपखल बसते आहे हे तर सर्वांना विदितच आहे. त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक योगी होते.

       ★ अंतीम संदेश ★

   देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, 

"मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करु नका | 

कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||" 

    याव‍रुन महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधी घेण्यापूर्वी म्हणाले, 


"दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | 

तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||" 


    देह त्यागून महाराज ब्रह्मिभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत, ज्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशिर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.


    सर्वाच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री गजानन महाराज चरित्राचे पारायण नेहमी करावे हि विनंती..


No comments:

Post a Comment