"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळ ➽

🤼‍♂⛹‍♀🤺🏌‍♀🏌🏂⛷🤼‍♀

विद्यार्थ्यांन मध्ये नवचैतन्य आणण्यासाठी खेळ खूप उपयोगी ठरतात. विद्यार्थ्यांना अध्ययन निरस वाने वाटू नये म्हणून आपण अधून मधून काही मनोरंजक खेळ घ्यावेत. या खेळातून त्यांना अध्ययनाचे धडे देण्याचा प्रयत्न करावा.
     मुलांना आवडतील असे काही खेळ मी आपल्यासमोर मांडत आहे.

      ⚽ 01) स्मरण खेळ :–     

      विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो. हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात.
उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात. मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात. नंतर त्या वस्तू कापडाने झाकून ठेवाव्यात. नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या. त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल.
जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.
●~~●~~~~●●~~~~●~~●

    ⚽ 02 ) ओंजळीने ग्लास भरणे ;–    

      मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लास भरावा लागेल.

       या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल. यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण
मदत होईल.
●~~●~~~~●●~~~~●~~●
      ⚽ 03) विष – अमृत :~      

    एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील. त्यांना एक मुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावे. दुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे. अमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतो. विष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृत देण्यापासून थांबवावे.

~~●~~~~ ~~~~●~~

     ⚽ 04. ) एकमेकांना हसवणे :–     

     मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा. काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकी एकाने
येउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही. वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून , विनोद
सांगून त्यांना हसवावे. जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे.

●~~●~~~~●●~~~~●~~●
     ⚽ 05. ) आवाज ओळखणे :–      

    एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नाव घेऊन बोलवावे. त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा. असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा.
●~~●~~~~●●~~~~●~~●

    ⚽ 06.) खोक्यातील वस्तू ओळखणे :–   

     एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या .
●~~●~~~~●●~~~~●~~●
     ⚽ 07) वासावरून वस्तू ओळखणे :–     

     बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे.

~~●~~~~~~~~●~~
     ⚽ 08.) फुगे फोडणे :–     

     लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा.

●~~●~~~~●●~~~~●~~●
     ⚽ 09.) बॉल फेकून मारणे :–     

    या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा.

●~~●~~~~●●~~~~●~~●
     ⚽10.) नेमबाजी :–    

   ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा.
~~●~~~~~~~~●~~
    ⚽ 11.) विद्यार्थी ओळखणे :–     

एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा.

●~~●~~~~●●~~~~●~~●
     ⚽ 12.) बादलीत चेंडू टाकणे :–     

एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा.
●~~●~~~~●●~~~~●~~●
     ⚽ 13.) संदेश पोचवणे :–    

या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे व्याक्य सांगावे. त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. अश्याप्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे. आपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते.

~~●~~~~~~~~●~~
    ⚽ 14.) आंधळी कोशिंबीर :–    

हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात. पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा.
●~~●~~~~●●~~~~●~~●

  ⚽ 15.) ठराविक वेळेत गणिते सोडवणे :– 
     मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतो आणि ४-५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो. त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षित आहे.
       सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे. अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा.
या खेळत १००% मुलांना सहभागी करावे.
●~~●~~~~●●~~~~●~~●

 ⚽ 16 ) पिदवणी/खुपसणी 
       हा खेळ प्रामुख्याने पावसाळयात खेळला जातो. पाऊस पडत असला कि अंगणात इतर खेळ खेळता येत नाही तर पण थोडा पाऊस थांबला की हा खेळ खेळता येतो. जमीन ओलसरच असावी. यासाठी दोन किंवा कितीही मुले चालतात.
       एक लोखंडाची छोटीशी ६ ते ९ इंच लांबीची काडी(कांब) घ्यायची. बारीक गजाचा तुकडा, किंवा मोडक्या छत्रीची लहानशी काडीही चालेल. पण कडक हवी.या काडीस जमिनीत खुपसण्यासाठी निमुळते टोक हवे. एकावर राज्य द्यायचे व इतरांनी ती काडी ओल्या जमिनीत/चिखलात रुतवायची. अशी फेकायची की जमिनीत खोचली गेली पाहिजे. पडली तर डाव गेला. अशी काडी रुतवत फेकत लांब जायचे डाव जाईपर्यंत सर्व भिडूंनी लांब लांब न्यायचे व नंतर राज्य असलेल्या मुलाने तेथपासून मूळ ठिकाणापर्यंत लंगडी घालत यायचे. जास्त मुले असली की खूप लांब दमछाक होते म्हणून याला पिदवणी म्हणायचे. कांब जमिनीत खुपसायची म्हणून या खेळास खुपसणी असेही म्हणतात.एखाद्या खेळात दमवणे याला 'पिदवणे ' असे म्हणत असत.

~~●~~ ~~~~~~●~~

 ⚽ 17 ) सूरपारंब्या 

       या खेळासाठी जरा मोठया झाडांची आवश्यकता आहे. कारण त्यावर चढून, उडया मारुन हा खेळ खेळायचा आहे. झाडाच्या फांद्या पक्क्या हव्यात. २/३ पासून कितीही मुले हा खेळ खेळू शकतात. अंगणात एक गोलाकार रेखून त्यामधे एक काडी/काठी ठेवायची. एकावर राज्य व इतरांपैकी एकाने पायाखालून वर्तुळातील काठी लांब फेकायची. राज्य असलेल्या मुलाने ती काठी आणून वर्तुळात ठेवायची. तेवढया वेळात इतर मुलांनी पटापट झाडावर चढून जायचे किंवा वडासारख्या झाडाच्या पारंब्याला लोंबकळून पाय जमिनीच्या वर घ्यायचे. कुणी खाली राहिल्यास त्याला राज्य घेतलेल्या मुलाने पकडायचे (आऊट करायचे), किंवा २ मुलानी   झाडावरुन उडी मारुन काठी पुन्हा पायखालुन फेकण्याचा प्रयत्न करायचा व राज्य असलेल्या मुलाने पटकन कुणाला तरी पकडायचे. जो आऊट होईल त्याच्यावर राज्य. पुन्हा सर्वांनी पळत जाऊन झाडावर चढायचे.

●~~●~~~~●●~~~~●~~●
 ⚽ 18 ) सागरगोटे/गजगे 

      हा मुलींचा खेळ समजला जातो. घरात कुठेही बसून खेळण्यासारखाहा मुलींचा खेळ समजला जातो. दोन व त्यापेक्षा अधिक कितीही मुली हा खेळ खेळू शकतात. या साठी सागरगोटे लागतात. हे एका झाडाला येतात. सागरगोटयाच्या झाडाला काटे असतात. म्हणून तयार बाजारातून आणावे. (नसल्यास वाळूतील सारख्या आकाराचे गोलाकार गुळगुळीत बोरा एवढे दगड ही चालतील) कमीत कमी ५ गोटे हवेत. दोन्ही जणी समोरासमोर बसून हा खेळ खेळायचा (अधिक मुली असल्यास गोलाकार बसावे) एका हाताने पाची सागर गोटे जमिनीवर हळूच पसरवून टाकायचे शक्यतो एकमेकाला चिकटू नयेत चिकटल्यास दुस-या मुली कडून मुंगीला वाट मागावी हळूच सरकवून अलग करावे. एक सागरगोटा उंच हवेत उडवून तो खाली येण्याच्या आत जमिनीवरचा दुसरा एकच सागर गोटा उचलावा व उंच उडवलेला सागरगोटा झेलावा असे झेलत उचलत जावे. उचलतांना झेलतांना सागरगोटा खाली पडला तर डाव गेला. नाहीतर पुन्हा खेळायचे पहिल्या डावाला एरखई म्हणतात, दुस-या डावाला दुरखई, तिस-याला तिरखई, चौखई असे. दुस-या वेळी एक सागरगोटा उंच फेकल्यावर खालील दोन सागरगोटे एकदम उचलायचे. तिरखईला ३ उचलायचे अशात-हेने पहिली फेरी संपते. दुस-या फेरीत 'उपली सुपली' करायची म्हणजे सर्व सागरगोटे दोन्ही हातांनी (ओंजळीने ) हळूच वर उडवायचे व सर्वच्या सर्व हाताची उपली ओंजळ करुन त्यात पकडायचे. यातही ३ प्रकार एकदा एकच हात उलटा करायचा उजवा डावा मग दोन्ही पाच खडे घेतले असल्यास प्रत्येकी पाच वेळा असे करायचे. तिस-या फेरीत 'चिमणी कोंबडयाची चोच' करायची म्हणजे दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुफुंन अडकवायची आणि फक्त दोन्ही हाताचे पहिले बोट सोडून त्या दोन बोटांनी खाली टाकलेले खडे एक एक करुन ओंजळीत टाकायचे. सर्व खडे टाकुन होईपर्यंत एकही गोटा खाली पडता कामा नये. चौथ्या फेरीत 'हंडी चढवायची’ म्हणजे पाच खंडयापैकी दोन दोन खडे जोडून जमिनीवर ठेवायचे व पाचवा खडा उंच फेकून, दोन खडयांची जोडी उचलायची व वरचा खडा झेलायचा नंतर परत एक खडा वर फेकून जमिनीवरची दुसरी जोडी उचलायची व पहिली जोडी जमिनीवर ठेवायची. असे लागोपाठ सतत ५० ते १०० वेळा (जेवढयाची हंडी ठरली असेल तेवढे) करायचे म्हणजे ती जिंकली. ऐरखई- दुरखई करतांना डाव गेला तर दुस-या भिडूला खेळू द्यायचे व पुन्हा आपला नंबर आला की पुढील डाव खेळायचा. सर्व फे-या जिच्या लवकर पु-या होतील ती जिंकली. एकदा सवय झाली की खडे ५-७-९ असे वाढवता ही येतात.

     घरात कुठेही बसून खेळण्यासारखा खूप मजेशीर आणि घरात कुठेही बसून खेळण्यासारखा हा खेळ ५०/५५ वर्षापूर्वी घराघरात खेळला जायचा. लहान मोठया मुली सर्व जण खेळतात. यामधे हात बोटे, डोळे, यांना उत्तम व्यायाम होतो झेल पकडायचे कौशल्यही असते.
~~●~~~~~~~~●~ ~
 ⚽ 19) डब्बा ऐसपैस  
      डब्बा ऐसपैस हा लपाछपीचाच खेळ असतो. मात्र या लपाछपीत डब्याचा आणि (डबा नसेल तर नारळाच्या करवंटीचा) वापर केला जातो. पाच-सहा किंवा त्याहून जास्त खेळाडू हा खेळ खेळू शकतात. या खेळात आधी राज्य कुणावर ते ठरवलं जातं. नंतर जमिनीवर एक गोलाकार रिंगण आखलं जातं. नंतर एक जण डबा किंवा करवंटी लांब फेकतो. राज्य असलेल्याला ती तिथून आणून रिंगणात ठेवावी लागते. तोपर्यंत सगळे खेळाडू लपतात.
      राज्य असणा-याला त्यांना शोधावं लागतं. त्याला कुणी सापडलं तर ‘अमुक तमुक डब्बा ऐसपैस’ असं म्हणत डब्यावर काठी आपटून त्या खेळाडूला बाद करतो. या प्रकारे सगळे खेळाडू बाद होईपर्यंत खेळ चालू राहतो, पण एखादा त्याने डब्बा ऐसपैस करायच्या आधी डबा किंवा करवंटी पायाने रिंगणातून बाहेर फेकण्यात यशस्वी झाला तर त्याच खेळाडूवर पुन्हा राज्य येतं. त्याने आधी कितीही जणांना डबा ऐसपैस केलं असेल तरी त्याचा उपयोग नसतो. हा खेळ तसा साधा-सोपा असला तरी तो खेळायला अनेक गडी लागतात, तसंच जागाही मोठी लागते.
●~~●~~~~●●~~~~●~~●

 ⚽ 20 ) कांदाफोडी 
    कांदाफोडी हा एक गमतीदार खेळ आहे. या खेळीची गंमत म्हणजे हा खेळ तुम्ही कितीही जणांत खेळू शकता. या खेळात तुम्हाला शक्य तितक्या उंच उडय़ा मारायच्या असतात. ज्याच्यावर राज्य आहे तो खाली पाय पसरून बसतो आणि बाकीचे खेळाडू त्याचा पाय ओलांडून जात असतात. या खेळाच्या दुस-या फेरीत राज्य असलेला एकावर एक पाय ठेवून बसतो. एकावर एक ठेवलेल्या पायाला ओलांडणारा खेळाडू त्याच्या पायाने स्पर्श करतो, त्यालाच कांदाफोडी असं म्हणतात. या प्रकारे खेळ सुरू झाल्यावर राज्य असलेला आपल्या लांब केलेल्या पायांवर एका हाताची करंगळी धरतो आणि हात सरळ ठेवतो. उर्वरित खेळाडू ते ओलांडून जातात. मग बसलेला खेळाडू एक करंगळीवर दुसरी करंगळी ठेवतो, त्यानंतर पुन्हा सगळे खेळाडू त्याला ओलांडतात.
     दुसरी आणि तिसरी फेरी कोणीही सहज ओलांडून जातो. पण जेव्हा राज्य असलेला हात-पाय एकावर एक धरून तो मनोरा उंचावतो, तेव्हा खरी मजा येते. प्रत्येक वेळी तो जे करेल, त्यावरून प्रत्येकाने उडी मारायची असते. उडी मारताना मारणारा पडला किंवा त्याच्या हात किंवा पायाचा स्पर्श झाला तर तो बाद होतो. हाता-पायाच्या वेगवेगळ्या अवस्था झाल्यावर राज्य असलेला हाताने पायाचे अंगठे पकडून ओणवा उभा राहतो. फक्त या वेळीच खेळाडूंनी त्याला उडी मारताना हात लावला तर चालतो. सरतेशेवटी राज्य असलेला उभाच राहतो, त्या वेळी त्याला ओलांडून जाणं हे कोणालाच शक्य नसतं, त्यामुळे या खेळात एकापाठोपाठ एक सगळेच बाद होतात व खेळ नव्याने सुरू होतो..
●~~●~~~~●●~~~~●~~●
 ⚽ 21 ) चोरचिठ्ठी 
     उन्हाळा म्हटलं की, आपल्याला घरी बसून बैठे खेळ खेळणं जास्त सोयीचं वाटतं. कारण उन्हात धावपळीचे खेळ खेळून आपण थकून जातो. अशा वेळी चोरचिठ्ठी हा खेळ खेळायला छान आहे. या खेळाची आणखी एक गंमत म्हणजे या खेळात कोणताही खेळाडू बाद होत नाही. या खेळात राजा, राणी, प्रधान, चोर, पोलिस असे पाच जण असतात आणि प्रत्येकाला गुण असतात. म्हणजे राजाला पन्नास, राणीला चाळीस, प्रधानाला तीस, पोलिसांना वीस आणि चोराला दहा गुण. या खेळाची सुरुवात करताना वहीचं एक कोरं पान घ्यायचं. त्या पानाच्या पाच चिठ्ठय़ा करायच्या आणि पानाच्या प्रत्येक चिठ्ठीवर राजा, राणी, चोर, पोलिस, प्रधान अशी नावं लिहायची. सर्व मुलांनी गोल करून बसायचं आणि त्या गोलात कोणी एका मुलाने या सगळ्या चिठ्ठय़ा एकत्र करून उडवायच्या. प्रत्येक मुलाने आपापली चिठ्ठी उचलायची. चिठ्ठी उघडून पाहिल्यावर त्या चिठ्ठीत जे नाव असेल ते कोणालाही सांगायचं नाही. ज्या मुलाच्या हाती ‘पोलिस’ असं लिहिलेली चिठ्ठी येईल, त्याने मात्र ते सगळ्यांसमोर जाहीर करायचं. नंतर पोलिस असलेल्या खेळाडूने ‘चोर’ कोण आहे हे ओळखायचं.
     चोर ओळखायला त्याला कोणीही मदत करायची नाही. प्रत्येक खेळाडूने इशारे न करता गुपचूप बसून राहायचं. जर त्या खेळाडूने चोराला बरोबर ओळखलं, तर तो जिंकला आणि चुकीचा चोर ओळखला तर तो हरला. तो जिंकला तर त्याला चोर आणि स्वत:चे मिळून तीस गुण मिळतील आणि हरला तर शून्य आणि ते तीस गुण चोराला जातील. या खेळाच्या अशा अनेक फे-या चालतात. पहिली फेरी संपली की, एका कागदावर सगळ्यांचे गुण नोंदवले जातात. मग पुन्हा चिठ्ठय़ा उडवून खेळ सुरू करायचा. हा खेळ तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही खेळू शकता. खेळाच्या शेवटी सगळ्यांचे गुण मोजले जातात, ज्याला सगळ्यात जास्त गुण असतील तो ‘चोरचिठ्ठी’ खेळाचा विजेता बनतो आणि या खेळात चिठ्ठय़ा एकदाच बनवायच्या आणि त्या जपून वापरायच्या. अशाने वह्यांची पानं खराब होत नाहीत.
●~~●~~~~●●~~~~●~~●
 ⚽ 22 ) शिवाजी म्हणतो.. 
    पळापळीचे, उडया मारण्याचे खेळ खेळून झाल्यावर खूप दमायला होतं. अशा वेळी जेव्हा पळापळीचे खेळ खेळायचा कंटाळा येतो, तेव्हा एखादा बैठा खेळ खेळावासा वाटतो. त्यातलाच एक मजेशीर खेळ म्हणजे ‘शिवाजी म्हणतो..’ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शिवाजी म्हणतो म्हणजे नक्की काय? आणि हा खेळ कसा काय होऊ शकतो? म्हणूनच आपण या जुन्या खेळाविषयी अधिक जाणून घेऊया..
      कोणताही खेळ खेळायचा म्हणजे त्यामध्ये आधी सुटावं लागतं. जो शेवटी राहणार त्याच्यावर राज्य हा नियम सगळ्याच खेळाप्रमाणे या खेळातही लागू होतो, पण या खेळात आणि इतर खेळातला मुख्य फरक असा की, इतर खेळात राज्य येणा-या एकटया खेळाडूला इतर खेळाडूंना पकडावं, शोधावं लागतं. मात्र या खेळात जो खेळाडू शेवटचा सुटणार त्याच्यावर नियमाप्रमाणे राज्य येतं. तो ‘शिवाजी’ बनतो आणि इतरांना आज्ञा करतो. तो जे सांगणार ते इतर खेळाडूंना ऐकावं लागतं. मग तो, ‘शिवाजी म्हणतो, हसा’, डोक्याला हात लावा’, ‘हसता हसता मधेच थांबा’, ‘डोळे बंद करा’ अशी फर्मानं सोडतो आणि इतर खेळाडू ती ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात. जो खेळाडू त्याच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा चुकेल तो त्या खेळातून बाद होतो. या प्रकारे सगळे बाद होईपर्यंत हा खेळ सुरू राहतो. सगळे बाद झाल्यावर दुसरा कोणीतरी खेळाडू शिवाजी बनतो आणि हा खेळ चालू राहतो. बैठा आणि गमतीशीर असलेला हा खेळ खेळायला खूप मजा येते.
●~~●~~~~●●~~~~●~~●

5 comments:

  1. खूप छान खेळ आहेत सर

    ReplyDelete
  2. Wow atishay Sundar likhan sir mulanche khelnyamdhun abhyasamdhe Sudha laksh lagel aani abhysachi Golisudha vadel .ashyach prakere Pratek shaleche culture asayala havet .khup Chan vichar aahes sir .

    ReplyDelete
  3. सगळे खेळ छान आहेत. शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढविणणारे खेळ.

    ReplyDelete
  4. विषयाला जोडून खेळ मिळेल का सर विज्ञान

    ReplyDelete