"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

महात्मा ज्योतिबा फुले



भारतातील थोर समाजसुधारक, सर्व सामान्याना शिक्षणाची दारे खुली करून सन्मानजनक आयुष्य जगण्याची उमेद निर्माण करणारे थोर महापुरूष, शेती तज्ञ, युगपुरूष राष्ट्रपिता क्रांतीसूर्य 


    ★ महात्मा जोतीबा फुले ★

━═•●◆●★◆★●◆●•═━
●जन्म :~ ११ एप्रिल १८२७, कटगुण, सातारा,महाराष्ट्र
●मृत्यू :~ २८ नोव्हेंबर १८९०, पुणे, महाराष्ट्र

वडील : गोविंदराव फुले
आई : चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी : सावित्रीबाई फुले

          ◆महात्मा जोतीबा फुले◆
   
           हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.
         ◆ सामाजिक कार्य

               २३ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितां कडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।"
  
     जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

        वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

◆◆◆●●●●●★★★●●●●●◆◆◆

बा जोतीबा तू तळपता सुर्य होता...
तूझ्याशी न पटनारे, आयुष्यभर भांडणारे
तूला पाण्यात पाहणारे, वाळीत टाकणारे भाऊबंद म्हणवणारे पुढ आले
तूझ पार्धीव उचलण्याचा हक्क सांगू लागले
दुर सारून त्यांना त्या सावित्री माऊलीन तूझ्या अंतयात्रेपुढं गाडगं धरल होत....!!!!!
तू लढलास, तू झगडलास, लकवा असतानाही
बापा तू डाव्या हातान लिहलास...
तूझा तो सार्वजनीक सत्यधर्म आता राज्यघटनेतच उतरलाय...!
तूझ्या देहावसानाची साधी दखलही घेतली न्हवती
स्वताःला सुधारक म्हणवून घेणाय्रांनी...
स्वराज्याच्या जन्मसिध्द हक्काच्या गप्पा मारणाय्रांनीही
तूझ्या मृत्यंची साधी बातमीही छापली न्हवती...!
माणसांसारख माणसाने जगण्याचा हक्कच नाकारणारे हे धुर्त रानटी लोक
त्यांना काय कळणार तूझा सार्वजनीक सत्यधर्म, तूझ जगण, मरूनही अमरत्वास पोहचण ....!!!
तू पेटवलेल्या जोतीची मशाल झाली
तू दाखवलेल्या सुर्यांने अंधाराची काळरात्र सरली...
तूझ्या ज्योतीने करोडो सावित्री तमातून मुक्त झाल्या...
शिळा झालेल्या कोटी कोटी अहिल्या तू लढलेल्या युध्दाने मुक्त झाल्या...!
स्त्रीस्वातंत्र्याचे महाकाव्य लिहीणारा तू महाकवी होता
तू ज्योती नव्हता बा जोतीबा तू तळपता सुर्य होता
तू तळपता सुर्य होता
तू तळपता सुर्य होता.....!!!

   सामाजिक क्रांतिकारक,  शिवजयंती जनक,  थोर समाजसुधारक, महात्मा ज्योतिबा फुले....
             विनम्र अभिवादन....


🔴🔵🟢🔘🟢🔵🔴


1 comment:

  1. Nice information is available for us Sir.
    Thanks a lot. And best wishes for your bright future ahead

    ReplyDelete