*❃❝ परोपकाराची संधी ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका राजाने दुस-या राजासाठी एक पत्र आणि एक भेटवस्तू पाठविली. पत्रात लिहीले होते की या भेटवस्तूचे मोल तुम्ही अधिक जाणून घ्याल. ती भेटवस्तू म्हणजे एक सोन्याची डबी होती आणि त्या डबीमध्ये एक डोळ्यात घालावयाचे अंजन होते. या अंजनाचे महत्व तुम्ही जाणून घ्या. आमच्या राज्यात या अंजनाचे महत्व अनन्यसाधारण आहे कारण हे अंजन डोळयात घालताक्षणी आंधळयाचे अंधत्व दूर होते आणि त्याला सर्व काही दिसू लागते. राजाने हे पत्र वाचताच तो विचारात पडला. कारण त्याच्या राज्यात नेत्रहीनांची संख्या भरपूर होती आणि डबीत पाठवलेले अंजन तर फक्त दोन डोळ्यांना पुरेल इतकेच होते. राजा ते अंजन आपल्या प्रियजनांसाठी वापरू इच्छित होता जेणेकरून त्याच्या मर्जीतील कोणीतरी हे जग पाहू शकेल. तेवढ्यात राजाला लक्षात आले की त्याचे एक वृद्ध मंत्री काही महिन्यांपासून कामावर येणे बंद झाले आहेत. कारण वृद्धत्वामुळे त्यांचे दोन्ही डोळे अधू झाले होते आणि त्यांना काही दिसत नव्हते. पण हे मंत्री अतिशय हुशार, प्रजाहितदक्ष, प्रामाणिक आणि चतुर होते. ते कामावर न आल्यामुळे राजालाही काही निर्णय घेणे अवघड जात होते. वडीलधारे असल्याने त्यांच्या सल्याने राज्यकारभार चालविणे राजाला सोपे जात होते. असा बुद्धिमान मंत्री केवळ अंधत्वामुळे घरी बसून होता हे राजाला पाहवले नाही. त्याने त्या मंत्र्याला घेऊन येण्यासाठी सेवक पाठविले. सेवक मंत्रीमहोदयांना घेऊन दरबारात आले. राजाने मंत्र्याला सगळी कहाणी सांगितली व त्याच्या हातात ती अंजन असलेली सोन्याची डबी देऊन सांगितले, केवळ तुम्हीच याचा वापर करा. जेणेकरून तुम्हाला दिसू लागेल व राज्याला तुमच्या सल्याचा फायदा मिळेल. मंत्र्याने ती डबी हातात घेतली व तो म्हणाला,''महाराज आताच्या आता येथे राजवैद्याला बोलावणे धाडावे.'' राजाला काहीच कळेना की मंत्री असा काय सांगत आहे. राजाने वैद्यबुवांना बोलावून घेतले व मंत्र्याच्या समोर उभे केले. मंत्र्याने सोन्याची डबी उघडली व त्यात दोन बोटे घातली. दोन्ही बोटावर लागलेल्या अंजनापैकी एक त्याने स्वत:च्या डोळयाला लावले. त्याक्षणी मंत्र्याला एका डोळ्याने दिसू लागले व दुसरे बोटावरील अंजन त्याने वैद्यबुवाच्या जिभेवर फिरवले. राजा पाहतच राहिला. त्याने मंत्र्याला विचारले,'' मंत्रीजी तुम्ही असे काय करत आहात, एका डोळ्यातच तुम्ही का अंजन घातले. खरेतर तुम्ही दोन्ही डोळ्यात अंजन घालू शकला असता पण तुम्ही दुसरे बोट वैद्यबुवाच्या जिभेवर का ठेवले'' मंत्री म्हणाला,'' राजन, मी जर दोन्ही डोळ्यात अंजन घातले असते तर मला दोन्ही डोळ्यांनी दिसले असते हा एक आनंदाचा भाग झाला असता व मी स्वार्थी ठरलो असतो. पण आता राजवैद्याने या अंजनाची चव घेतली आहे व त्यातून वैद्यबुवा इतके निष्णात आहेत की चवीनुसार ते अंजन बनवू शकतात, त्या अंजनात कोणते घटक मिसळले आहेत व आपणही आपल्या राज्यात असे अंजन बनवून आपल्या राज्यातली नेत्रहीनांची संख्या कमी करू शकू. यासाठी मी केवळ एका डोळयात अंजन घातले आहे.'' राजा व दरबारीजन मंत्र्याच्या या परोपकारीवृत्तीने प्रभावित झाले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
परोपकाराची संधी जेव्हा कधी आपल्या आयुष्यात येईल तेव्हा त्या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment