"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

जीपीएस म्हणजे काय ?

*******************************

        हल्ली पर्यटन करण्याची एक चांगली सवय सर्वसामान्यांना लागलेली आहे. पर्यटनाचा फार मोठा फायदा आपणाला होत असतो. त्या ठिकाणचं राहणीमान, भौगोलिक संपन्नता, सामान्यांचे प्रश्न या निमित्ताने समजण्यास मदत होते. अर्थात तसा दृष्टीकोन ठेवून पर्यटन केले तरच बरं का ! असे पर्यटनाला गेलो तर रस्ते सापडणे किंवा ठिकाण मिळणे काहीवेळा अवघड होते. प्रत्येक वेळी कोणाला तरी पत्ता विचारत राहणं सुद्धा नकोसं वाटतं. पण आता एक नवी प्रणाली आपल्या हातात आलेली आहे. जीपीएस त्याचं नाव. मोबाइलमध्ये असलेल्या या सिस्टीममध्ये नुसतं ठिकाण टाइप केलं किंवा आवाजाच्या माध्यमातून जरी सांगितलं तरी आपणाला त्या ठिकाणी सहीसलामत पोहोचवण्याचं काम ही जीपीएस यंत्रणा करते.

          एखाद्या गावाचं किंवा ठिकाणाचं स्थान आपण त्याच्या अक्षांश आणि रेखांशावरून ठरवू शकतो. पण एव्हरेस्टचं ठिकाण निश्चित करण्यासाठी एवढीच माहिती पुरेशी नाही. कारण लांबी, रुंदी बरोबरच उंचीचीही जोड त्यासाठी आवश्यक आहे. तीन मितीतील म्हणजे थ्री डायमेन्शनमधील माहिती मिळाली तरच आपण कोणत्याही ठिकाणचा पत्ता निश्चित करू शकतो. आता प्रश्न एवढाच उरतो की, या तीन मितींची माहिती मिळवायची कशी ? ती माहिती मिळवायची असेल तर उपग्रहांची मदत घेतली पाहिजे. आणि तेही भूस्थिर उपग्रह. हे उपग्रह जवळपास छत्तीस हजार किलोमीटर अंतरावर असतात. पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरत आहे त्याच वेगाने ते पृथ्वीबरोबर फिरत असतात. त्यामुळे पृथ्वीच्या दृष्टीने ते स्थिर वाटतात. म्हणूनच त्यांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. कमीत कमी तीन भूस्थिर उपग्रह एकमेकाला एकशे वीस अंशाचा कोन करतील अशा पद्धतीने अवकाशात ठेवले तर आपणाला जगातील कोणत्याही ठिकाणची माहिती तरंग लहरींच्या माध्यमातून समजते. तीनपेक्षा जास्त उपग्रह ठेवले तर माहितीची अचूकता वाढू शकते.

         दिशादर्शक प्रणाली म्हणजे ठिकाणांची माहिती देणाऱ्या उपग्रहांचा समूह. सध्या सर्वात लोकप्रिय असणारी दिशादर्शक प्रणाली ही अमेरिकेची आहे. तिला जीपीएस म्हणजे 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम' म्हणतात. वापरण्यास अत्यंत सोपी असल्यामुळे ती सध्या सर्वमान्य झालेली आहे. अमेरिकेबरोबरच इतर देशांच्या सुद्धा दिशादर्शक प्रणाली अस्तित्वात आहेत. त्यामध्ये रशियाची ग्लोनास किंवा ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम, युरोपीय समुदायाची गॅलिलिओ, चीनची बेंड्डु, जपानची रक्वासी झेनिथ सॅटेलाईट सिस्टीम कार्यरत आहेत.

        भारताचीही स्वतःची दिशादर्शक प्रणाली आहे. तीचे नाव आहे आयआरएनएसएस (Indian Regional Navigation Satellite System)

         ही दिशादर्शक प्रणाली केवळ स्मार्टफोन पुरतीच मर्यादित न राहता तिचे अनेकविध उपयोग आहेत. आपत्ती व्यवस्थापन, वाहनांचा शोध, मोबाइल फोन यंत्रणेशी समन्वय, अचूक नकाशे, पर्यटक आणि गिर्यारोहकांना दिशादर्शनासाठी, वाहक चालकांना दृश्य आणि ध्वनींसह दिशा सांगण्याबरोबरच लष्करासाठी ती उपयुक्त असल्यामुळे काहीवेळा धोकासुद्धा संभवतो. भारताच्या या दिशादर्शक प्रणालीचा एकूण खर्च एक हजार चारशे वीस कोटी रुपये आहे. जीपीएसवर सध्या अवलंबून असणाऱ्यांनी आणि विकासाचे फायदे घेणाऱ्यांनी तरी अंतराळ संशोधनासाठी होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे. ज्या उपेक्षित घटकांना या विकासाचे फायदे मिळत नाहीत त्यांचा विचार करणं आवश्यक आहे.
                              *- नितीन शिंदे *'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून*


No comments:

Post a Comment