"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 269

    *❒ ♦महात्मा बसवेश्वर♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
 (इ.स. ११०५ - इ.स. ११६७)

      हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला लिंगायत पंथ या नावाने ओळखले जाते वीरशैव लिंगायत समाजाचे प्रसारक महात्मा बसवेश्वर यांची अक्षय्यतृतीयेला जयंती आहे. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सर्व कनिष्ठ व उच्च जातीतील लोकांना वीर शैव लिंगायत समाजात प्रवेश दिला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, वारांगणांचे पुनर्वसन असे कार्य केले. सध्याच्या जातीधर्माच्या राजकारणात त्यांचे विचार समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहेत.कर्नाटकातील विजापूर जिल्ह्य़ातील बागेवाडी येथे बसवेश्वरांचा जन्म झाला. इ. स. ११०५ ते ११६७ बसवेश्वरांचा जीवन काल आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया हा त्यांचा जन्मदिवस. नंदीचे रुप म्हणून त्यांचे नाव वृषभ ठेवण्यात आले नंतर बसव व बसवेश्वर असे नामकरण झाले. बसवेश्वरांनी आठव्या वर्षी उपनयन (मुंज) करण्याचे नाकारले. त्यांनी लिंगभक्ती व यज्ञोपवेद एका ठिकाणी राहू शकत नाही असे सांगून घराचा त्याग केला. कुडलसंगम येथे जाऊन ते जातवेद मुनींकडे राहू लागले. कर्नाटकात कृष्णा व मलप्रभा नद्यांच्या संगमावर हे शिवमंदीर होते. संगमेश्वरावर बसवेश्वरांची श्रद्धा होती. येथेच त्यांनी जातवेदमुनींकडून लिंगायत समाजाची दीक्षा घेतली. येथे वेदाभ्यास अनेक धार्मिक ग्रंथांचे अध्ययन, चिंतन, मनन बसवेश्वरांनी केले. तत्कालीन समाजातील लोकांचा कर्मकाण्ड व अंधविश्वास पाहून त्यांचे मत त्यांना स्वस्थ बसु देईना. ते वैदीक परंपरा विरोधी होते. कल्याण येथे बिज्जल दरबारात बसवेश्वरांचे मामा बलदेव नोकरीस होते. त्यांनी बसेवश्वरांस कल्याणला नेऊन तेथे नोकरी देववीली व आपली कन्या गंगाबिकाचा विवाह त्यांचे सोबत लावून दिला. बसवेश्वरांची योग्यता ओळखून बिज्जलाने त्यांना कोषाध्यक्ष केले व आपली मानलेली बहीण निलंबिका हिचा विवाह बसवेश्वरांशी लावून दिला. व ती त्यांची द्वितीय पत्नी बनली. लोकोद्धार करण्यासाठी जणू काही पंचायतच त्यांच्याबरोबर तयार झाले. त्यात बहीण अक्कु, तिचे पती शिवदेव, भाचा चन्नबसेश्वर, पत्नी गंगाबिका व निलांबिका यांच्या सहाय्याने त्यांच्या समाज प्रबोधनास गती मिळाली. त्यांचे मन राज्यकारभारात रमेना. त्यांना सत्तेचा लोभ नव्हता. मंत्रीपदावर असताना त्यांनी सामाजिक क्रांतीची चळवळ सुरू केली. १९ व्या शतकात मोठी सामाजिक क्रांती झाली. त्याचा जनक कार्ल मार्क्‍स होता हे सर्वज्ञात आहेच. पण त्या अगोदर १२ व्या शतकात ही क्रांती बसवेश्वरांनी घडवून आणली. स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शकतात घातला. समाजातील सर्व मानव व त्यांची जात, पात, धंदा, वर्ण यामध्ये भेद नसून त्यांचे नाते बरोबरीचे आहे असे ते मानत. बसवेश्वर राज दरबारी असताना अस्पृश्य लोकांकडे जेवत. अनेक जातींतील लोकांना वीरशैव धर्माची दिक्षा दिली. आंतरजातीय विवाहाचा पायंडा घातला व समाज परिवर्तनाचे कार्य चालूच ठेवले. लोक भाषा कन्नड मधून त्यांनी वचने लिहिली ती अत्यंत प्रभावी व प्रसिद्ध झाली. बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची दीक्षा घेतली कारण त्यावेळी हा धर्म अत्यंत पुढारलेला व सर्वधर्मसमावेशक होता. त्याची तत्वे बसवेश्वरांना अत्यंत भावली. वीरशैव धर्म प्रचारासाठी इ. स. ११६२ मध्ये अल्लम प्रभूंच्या अध्यक्षतेखाली अनुभवमंडप (शून्यपीठ)ची स्थापना केली. तेथे सर्व जातीधर्मातील स्त्री-पुरूष शिवशरण-शिवशरणी म्हणून धर्मविषयक चर्चासत्रांमध्ये भाग घेत असत. विधवा व परितक्त्या तसेच वेश्या अशा सर्व स्तरांवरील स्त्रीयांना त्याकाळी अनुभव मंडप हे मुक्त व्यासपीठ होते. मध्ययुगात कित्येक युगांपासून अनेक प्रकारच्या बंधनात जखडून ठेवलेल्या स्त्रीयांना त्यांनी समता, स्वतंत्रता व समाज अधिकार मिळवून दिले. स्त्री शिक्षणावर भर दिला. तत्कालीन स्त्रीयांना त्यांच्या कुवतीनुसार व आवडीनुसार कामे दिली व स्वयंपूर्ण व शिक्षित केले म्हणून खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनीच घातला असे म्हणणे योग्य होईल. फक्त स्त्री शिक्षणच नाही तर पुरूषांच्या बरोबरीने स्त्रीयांना समान हक्क दिले. अनुभव मंडपात त्यांना त्यांचे विचार मांडण्याची संधी दिली. विधवांचे पुनर्विवाह केले. वेश्यांचेसुद्धा बसवेश्वरांनी पुनर्वसन केले. १२ व्या शतकात या धर्मातच फक्त स्त्रियांना मंदीरात प्रवेश होता. लिंगपुजेचा अधिकार होता. केशवपन किंवा सूतक व विटाळ फक्त वीरशैव व लिंगायत धर्मातच पाळला जात नव्हता. मांसाहार ही पद्धत लिंगायत धर्मात नव्हती. सर्वधर्माना या धर्मात प्रवेश (दीक्षा) घेता येत होता आणि आजही ती परंपरा चालू आहे. बसवेश्वरांच्या या कार्यात त्यांना त्यांच्या दोन्ही पत्नी गंगाबिका व निलांबिका यांनी मोलाची साथ दिली. बसवेश्वरांचे मन समाजातील विषमता, अंधश्रद्धा, वर्णभेद, कर्मकाण्ड पाहून होरपळून निघाले. समाजातील सर्व मानव जात, धंदा, वर्ण, स्त्री-पुरूष, यामध्ये भेद नसून सर्वाचे नाते बरोबरचे आहे असे ते मानत व ही विषमता दूर करण्यासाठीच त्यांनी सर्व उच्चनीच, गरीब, श्रीमंत अशा सर्व स्तरांतील लोकांना वीरशैव धर्माची दीक्षा देऊन वीरशैव धर्म प्रसार केला. महान कार्याने त्यांना महात्मा बनविले. इष्टलिंग विभूती धारण करणे, वीरशैव धर्माचे पंचाचार अष्टावण्य व षटस्थल या तत्वत्रयींचा प्रत्येक वीरशैवाने अवलंब करावा ही त्यांची शिकवण होती. त्यांचा कर्मकाण्डावर विश्वास नव्हता. कुठलाही हिंसाचार त्यांना मान्य नव्हता. ते शाकाहाराचे भोक्ते होते. यात्रा, जत्रा, होम हवन, यज्ञ, उपास तापास, मंत्राची पोपटपंची आदी गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. इ. स. ११६७ मध्ये ते कुडलसंगम येथे शिवैक्य झाले, पण सर्व थोर संत महात्म्यांची किंमत जगाला त्यांच्या मरणोत्तर समजली असा आपला इतिहास सांगतो. बसवेश्वराचे महान कार्य व त्यांच्या विचारांची ओळख समाजाला उशीरा पटली व आजही त्याची समाजाला गरज आहे. कर्नाटकात कुडलसंगमला म. बसवेश्वरांचे समाधीस्थान आज पवित्र तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेले आहे. कृष्णा व मलप्रभा नदीच्या संगमावर पाण्यात पुलासारखे बांधकाम करून कर्नाटक सरकारने सुंदर मंदीर (समाधीस्थळ) बांधले आहे. तेथे अनुभव मंडपाची नव्याने भव्यदिव्य उभारणी केली आहे. वीरशैव धर्मावरील स्त्री भाषीय पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय तेथे आहे. अत्यल्प दरात तेथे अभ्यासुंना, शिवभक्तांना, पर्यटकांना राहण्याची सोय आहे. प्रत्येक वीरशैवाने एकदा तरी हे स्थळ पहावे असे आहे. बसवेश्वरांचे अविस्मरणीय कार्य पाहून तेथे प्रत्येक जण नतमस्तक होतो व दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळतीची अनुभूती येते.

  (बसवेश्वर समाधी - कुडलसंगम जिल्हा बागलकोट, कर्नाटक) 

No comments:

Post a Comment