━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एक म्हातारं जोडप होतं. घरा जवळच्या जागेत भाज्या लावाव्यात म्हणून तन-मन लावून झटत होते. एकदा खणता खणता त्या म्हाता-या माणसाच्या कुदळीला काही तरी लागलं. त्यानं खणून पाहिलं तर ती एक पेटी होती. उघडताच त्यातल्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या. ती म्हातारी स्री म्हणाली,चला,आपण आता श्रीमंत झालो. आपल्या संकटकाळी देवाने आपल्यासाठी मदत पाठवली आहे.
हे बघ,उगीचचं लाळ घोटू नकोस. ही जागा आपल्या मालकीची नाही. तेव्हा कशावरून देवाने ही संपत्ती आपल्यासाठीच पाठवली अाहे,असे समजायचे ?
म्हातारा म्हणाला. आपण ही अशीच इथे ठेवू देऊया. जर समज, ही संपत्ती आपल्यासाठीच देवाने पाठवली असेल,तर ती पाठवण्याची व्यवस्थाही तोच करेल.
पेटी होती त्याच जागी पुन्हा ठेवून ते दोघे तिथून निघून गेले. म्हातारीने ही गोष्ट सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. पण कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्या सगळ्यांना वाटलं की,म्हातारी काहीतरी थापा मारतेय. त्या गावात एक व्यापारी राहत होता.त्याला संपत्तीची खूप हाव होती त्याचाही तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता.पण एकदा खात्री करून घ्यावी या उद्देशाने तो एका रात्री त्या ठिकाणी पोहोचला. त्याने आपल्याबरोबर आपल्या दोन मुलांनाही घेतले.त्या तिघांनी ती पेटी खणून वर काढली. पेटीचे झाकण उघडताच नागाचा फुत्कार त्यांना ऐकू आला. तशी त्यांनी पेटी घाईघाईने बंद केली.आता मात्र व्यापा-याची खात्री पटली की, म्हातारीने आपल्याला फसवण्या साठीच हा डाव टाकला आहे. तेव्हा तिला चांगली अद्दल घडवावी या उद्देशाने त्या तिघांनी ती पेटी दोरखंडाने बांधून ओढत ओढत म्हातारीच्या घराबाहेर आणली व ते निघून गेले.
सकाळी दरवाजा उघडताच ती पेटी दारात पाहून त्या दोघांनाही आनंद झाला. ती पेटी उघडताच पुन्हा त्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या. त्या पेटीतून तो नाग केव्हाच पसार झाला होता. आता मात्र दोघांची खात्री पटली की, देवाने आपल्यासाठी पाठवलेली ही *दैवी संपत्तीच* आहे.
No comments:
Post a Comment