━━═•●◆●★◆★●◆●•═━━
"धन्नाशेटचा मुलगा राम खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.
दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.'
मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला.
दुसर्या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला.
तिसर्या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले.
स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'.
ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?'
शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे.
दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.'
🌀❝ तात्पर्य ❞ ::~ स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.
No comments:
Post a Comment