*❃❝ दोन कवड्या ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
बादशहाच्या अकबराच्या दरबारात कलाकारांना मानसन्मान दिला जात असे. तानसेनासारखा महान संगीतकार अकबराच्या दरबाराची शोभ होती. त्यावेळी तानसेनच्या तुलनेत दुसरा कोणीच संगीतकार नव्हता. त्यामुळे तानसेनला थोडा अहंकार झाला होता. त्यावेळी काही संगीतसाधकांनी आपल्या संगीत साधनेतून ईश्र्वराला लक्ष्य बनवले होते. हे लोक संगीताच्या माध्यमातून ईश्र्वराची उपासना लीन होऊन करत होते. यात अष्टछापचे कवी तसेच वल्लभ संप्रदायाचे काही आचार्य होते. एक दिवस तानसेन आचार्य विठ्ठलनाथ यांना भेटायला गेला. काही वेळ चर्चा केल्यावर तानसेनने विठ्ठलनाथांच्या सांगण्यावरून आपले गायन प्रस्तुत केले. विठ्ठलनाथांनी गायनाची स्तुती केली व तानसेनाला दहा सहस्त्र रूपये व दोन कवड्या इनामाच्या रूपात भेट दिल्या. तानसेनने कवडी देण्याचे कारण विचारले असता विठ्ठलनाथ म्हणाले,’’तुम्ही मुघल दरबाराचे प्रमुख गायक आहात त्यामुळे दहा हजारांचा इनाम देण्यात आला आहे आणि दोन कवड्या ही व्यक्तिगत माझ्या दृष्टीने तुमच्या गायनाची किंमत आहे.’’ तानसेनाला फार वाईट वाटले. तो जायला निघणार इतक्यात श्रीकृष्णाचे दुसरे भक्त गोविंद स्वामी तेथे आले आणि विठ्ठलनाथांच्या आग्रहावरून त्यांनी कृष्णाचे एक पद गायिले. ते ऐकून तानसेनच्या डोक्यात असलेला स्वत:च्या गायनाविषयीचा भ्रम कमी झाला व तो म्हणाला,’’ विठ्ठलनाथजी महाराज, माझ्या गायनाची वास्तवात खरेच किंमत दोन कवड्याइतकीच आहे. मी बादशहाला खुश करण्यासाठी गातो आणि तुम्ही ईश्र्वराला प्रसन्न करण्यासाठी गात असता. मखमल आणि गोणपाट यांची कधीच तुलना होऊ शकत नाही त्याप्रमाणे तुमचे गायन ईश्र्वरी आहे तर माझे मानवी आहे. आपण चांगले केले की माझा अहंकार तोडला’.’
*_🌀तात्पर्य_ ::~*
कोणतेही काम ईश्वरासाठी व ईश्वराचे कार्य मानून केल्यास त्यात आपोआपच दैवी गुण प्रगट होतात.
No comments:
Post a Comment