हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता...
❒ ♦अमिताभ बच्चन♦ ❒
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ११ ऑक्टोबर १९४२,अलाहाबाद★ अमिताभ बच्चन ★
हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे हिंदी साहित्यातील ख्यातनाम कवी होते. त्यांच्या आईचे नाव तेजी बच्चन. अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकाता येथे एका कंपनीत काम केले. नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी (१९६९) या चित्रपटात सर्वप्रथम भूमिका मिळाली. त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद (१९७१) या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार कलाकार राजेश खन्ना यांच्या समवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोष्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला. त्या पाठोपाठ आलेला जंजीर (१९७३, दिग्द. प्रकाश मेहरा) चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका विशेष गाजली आणि येथूनच त्यांची संतप्त तरुणाची (अंग्री यंग मॅन) प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली. प्रचलित समाज व्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या संतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त घनगंभीर आवाज आणि गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच 'सुपरस्टार' (अभिनय सम्राट) पदावर पोचले व रूपेरी पडद्यावर जणू अमिताभ युग सुरू झाले. आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही.
बच्चन हे त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. आतापर्यंत त्यांनी सुमारे १६८ पेक्षा जास्त चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले.
बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाज हे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पार्श्व-निवेदनही दिले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार जया बच्चन (भादुरी) या त्यांच्या पत्नी होत. १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन व सून ऐश्वर्या राय हेही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे सुप्रसिद्ध कलावंत होत.
मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले. राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही. तीन वर्षांनंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजिनामा दिला. त्यांच्या लोकप्रियतेचे एक उदाहरण म्हणजे, १९८२ साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्यांना अपघात झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या.
आतापर्यंत त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या किताबांनी गौरविले आहे. या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत. विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत.
त्यांनी १९९६ मध्ये 'ए बी सी एल्' (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि.) ही चित्रपटनिर्मितिसंस्था स्थापन केली होती. आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली. २००० मध्ये 'कौन बनेगा करोडपती' या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनानेघालून दिला. आजही ही मालिका भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय व वाहिन्यांना सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी मालिका म्हणून ओळखली जाते. प्रारंभी स्टार टीव्हीवर व नंतर सोनी टीव्हीवर ही मालिका आजही सुरू आहे. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी आपल्या भूमिकांचा बाज बदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या सत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
No comments:
Post a Comment