*❃❝ कावळा आणि मैना ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात ढग भरून आले होते. एका निंबाच्या झाडावर खूप सारे कावळे बसले होते. ते सारे कावळे झाडावर बसून काव-काव करत होते आणि एकमेकांशी भांडत होते. तितक्यात तिथे एक मैना आली आणि त्याच झाडाच्या एका फांदीवर जावून बसली. मैनेला झाडावर बसलेले पाहताच सगळे कावळे आपले भांडण विसरून एकत्र झाले व मैनेवर धावून आले. बिचारी मैना त्यांना म्हणाली,"आज खूपच अंधारून आलंय, त्यातच मी माझ्या घरट्याचा रस्ता पण विसरले आहे मला कृपा करून इथे राहू द्या." सगळे कावळे एकसुरात ओरडले,"नाही, नाही, हि आमची बसायची जागा आहे तू इथे राहू शकत नाही." मैना म्हणाली," झाडे तर ईश्वराने सर्वासाठी बनविलेली आहेत. मी खूप छोटी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे मला कृपा करून इथे राहू द्या.'' कावळे म्हणाले,'' आम्हाला तुझ्यासारखी बहिण नको, तु देवाचे नाव घेतेस ना, मग जा त्या ईश्वराकडे आसरा मागायला, इथे कशाला तडमडायला आलीस, तू जा नाहीतर आम्ही तुझ्यावर तुटून पडू आणि तुझा जीव घेऊ.'' कावळे हे आपआपसात नेहमीच भांडणे करताना आपणास नेहमी पाहावयास मिळतात. नेहमी कावकाव करत एकमेकांशी भांडणे करताना रोज संध्याकाळी आपणास ते पाहावयास मिळू शकेल. मात्र दुस-या कोणत्या पक्ष्याविरूद्ध मात्र ते एकत्र होऊन ते लढतात हे पण खरे आहे. मैनेच्याबाबतीतही तसेच झाले. मैनेला कावळ्यांनी जाण्यास सांगितल्यावर ती बिचारी तिथूनच जवळच असणा-या एका आंब्याच्या झाडाकडे उडत गेली व तिथे एका फांदीवर बसली. थोड्याच वेळात मोठा पाऊस पडू लागला. पावसाचे मोठमोठे थेंब व त्याच्याबरोबरच गाराही पडू लागल्या. गारा देखील मोठमोठया पडू लागल्या. गारा पडू लागल्या व त्या कावळ्यांना कळेना की कोठे जावे. कारण निंबाच्या झाडावर फारसा आडोसा होत नाही. त्यांना गारांचा मार बसू लागला. बाहेरही पडता येईना की झाडावरही बसता येईना. बंदूकीतून सोडलेल्या गोळीसारखा गारांचा मार त्यांना बसू लागला. इकडे मैना ज्या झाडावर बसली होती त्या आंब्याच्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली व नैसर्गिकपणे तेथे एक आडोसा (खोपा) तयार झाला. छोटीशी मैना त्या खोप्यात सहजपणे बसू शकत होती. मैना आत गेली आणि तिला त्या पावसाचा व गारांचा काहीच मार बसला नाही. रात्रभर मुसळधार पाऊस पडला. सकाळ झाली आणि मैना त्या खोप्यातून बाहेर पडली आणि तिने जे पाहिले ते आश्चर्यचकित व दु:खद होते. रात्रीच्या गारांच्या माराने बहुतांश कावळे मृत्युमुखी पडले होते. तिला त्याचे खूप दु:ख झाले. तिला उडताना पाहून त्यात मरणोन्मुख असणा-या कावळ्याने विचारले की मैना तू जिवंत कशी यावर मैनेने उत्तर दिले,'' मी ज्या झाडावर बसले होते तेथे बसून मी ईश्वराची प्रार्थना केली व त्यानेच मला या संकटातून वाचविले. दु:खात परमेश्वरच आपली सुटका करू शकतो.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
ईश्वर संकटातून सुटका करतो किंवा संकटकाळात ईश्वर आपल्याला सुबुद्धी देऊन संकटात मार्ग सुचवितो.
No comments:
Post a Comment