ह्या दिवशी अनेक घरांमधील गणपतींचे तर चाळीस हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सवांचे विसर्जन केले जाते.
गणपतीचे विसर्जन करताना इतरांना तसेच मूर्तीला आणि भक्तांना कुठल्याही तर्हेची इजा होणार नाही; सारे काही सुरळीत, निर्विघ्नपणे पार पडेल ह्याची डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
श्रीगणेशचतुर्थीच्या दुसर्या दिवसापासून गणपतीची सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा पंचोपचारी पूजा केली जाते. अनंतचतुर्दशीलादेखील सकाळी अशी पंचोपचारी पूजा करावी. नंतर नैवैद्य दाखवावा. उत्तरपूजा करावी. गणपतीच्या शेजारीठेवलेल्या श्रीफळांना जागेवरून हलवावे. नंतर आपल्याला घरच्या अथवा मंडळाच्या प्रथेनुसार दुपारपर्यंत मूर्ती विसर्जनासाठी बाहेर आणावी. ह्यावेळी मूर्तीचे मुख घराच्या, मंडपाच्या दिशेकडेच हवे. वाजत-गाजत मिरवणुकीने ती ठरलेल्या ठिकाणी जलाशयावर आणावी. तिथे मूर्तीला पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा. पुन्हा एकदा आरती करावी. नंतर तिचे श्रद्धापूर्वक-काळजीपूर्वक सन्मानाने विसर्जन करावे, असा सर्वसाधारणपणे ह्या विसर्जनाचा विधी आहे. घरचा असो वा सार्वजनिक आपापल्या गणपतीचे विसर्जन करताना इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही; तसेच मूर्तीला आणि भक्तांना कुठल्याही तर्हेची इजा होणार नाही; सारे काही सुरळीत, निर्विघ्नपणे पार पडेल ह्याची डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
सध्या संपूर्ण जगाला विविध प्रदूषणांनी त्रस्त करून सोडले आहे. गणेशचतुर्थीसारखे उत्सव साजरे करताना ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण होऊ नये, पर्यावरणाला धोका पोहोचू नये म्हणून आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. गणपतीच्या मूर्तींच्या उंचीचा अतिरेक आज अनेक प्रश्नांना आणि वादांना निमंत्रण देताना दिसतो. लोकांची गर्दी व्हावी म्हणून मंडळे मूर्तीची उंची वीस-बावीस फुटांहून अधिक करतात. धर्मशास्त्रानुसार हे अयोग्य आहेच, शिवाय मूर्ती उत्सवासाठी आणताना, उत्सवकाळात आणि विसर्जनाच्या वेळी तिला दुखापत होऊन ति भंगू नये म्हणून फार जपणे गरजेचे असते. विसर्जनाच्या वेळी योग्य तर्हेने विसर्जन करणे शक्य होत नाही. त्यातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे पाण्यात विघटन होत नाही. त्यामुळे दुसर्या दिवशी वजनाला हलके असल्याने मूर्तीचे अवयव किनार्यावर विखुरल्याचे दु:खद दृश्य बघावयास मिळते. देवाचे, उत्सवाचे, धर्माचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक भाविकाचे परमकर्तव्य आहे. त्यात चालढकल होणे, दुर्लक्ष होणे हे अक्षम्य आहे. ह्या चुका होऊ नयेत म्हणून मुळात मूर्तीची उंची माफक ठेवावी. शक्यतो धर्मशास्त्राने सांगितल्याप्रमाणे शाडूची मूर्ती असावी. ती नैसर्गिक रंगाने रंगविली जावी. ह्या सर्व दक्षता घेतल्याने जलप्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मूर्तीचे विसर्जन पाण्यामध्येच करावे, असा धर्मसंकेत आहे. जिथे मोठे जलाशय, समुद्र, नद्या नाहीत तिथे तलाव-विहिरींमध्ये घरगुती गणपतीचे विसर्जन करता येते. पण मोठ्या गणपतींचे विसर्जन कुठे करावयाचे ही समस्यादेखील उग्र रूप धारण करीत आहे. त्यावर तात्पुरते कृत्रिम तलाव निर्माण करणे हा उत्तम उपाय आहे. तर घरगुती गणपतीचे मोठ्या बादलीत विसर्जन करून ते पाणी नंतर दुसर्या दिवशी घराभोवतीच्या झाडांना घालावे. हा विचार मी दोन वर्षांपूर्वी मांडला आणि तो अनेकांनी आचरणातही आणला. त्याचा विचार इतरांनीही जरूर करावा. मूर्तीचे पावित्र्य राखणे आणि पर्यावरणात बाधा येऊ न देणे ह्या दोन्हींचे भान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात आपल्या कर्तव्याचा विसर पडू न देण्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. गणेशमूर्तीप्रमाणेच निर्माल्याच्या विसर्जनाची समस्यादेखील अनेकांना भेडसावत असते. पाण्यात निर्माल्य टाकल्याने पाणी अधिकच दूषित होईल. म्हणून आता निर्माल्य कलशांची पर्यायी व्यवस्था शहरांमधून केली जाते. ती खेडोपाडीही केली गेली पाहिजे. ह्या निर्माल्यापासून खत करण्यात येते. तो प्रकल्पदेखील गावपातळीवर सुरू करण्याची गरज आहे.
प्रत्येकजण आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी मानून त्याप्रमाणे वागू लागला, तर सर्वांना आनंद देणारा गणेशोत्सव अधिकाधिक आनंददायी ठरेल यात शंका नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने इतर अनेक गोष्टी दरवेळी नव्याने कळतात. गणपतीसाठी जो खर्च असतो तो थोडा कमी करून त्यामधील पाच टक्के रक्कम आपल्याला आवडेल त्या धर्मकार्यासाठी वापरली जावी. ह्यामध्ये देवळांच्या जीर्णोद्धारासाठी देणगी,अन्नदानासाठी मदत, शाळेला देणगी, हुशार मुलांच्या शिक्षणाला आवश्यक त्या वस्तूंचे वाटप अशी अनेक कामे करता येतात.
मी स्वत: बराच विचार करून गणेशाचे पूजन, त्याची सेवा जरा वेगळ्या प्रकारे कशी करता येईल त्याबद्दल पंचवीस वर्षांपूर्वी ‘मोरया! असे या!’ हा लेख लिहिलेला. भरमसाट खर्च करून, दिव्यांची रोषणाई, ढोलताशांवर नाच करून गणेशाचे पूजन झाले असे मानावयाचे का? गणेशाचे जे गुण, जी गुणवैशिष्ट्ये त्याच्या ज्या आवडीनिवडी त्यांचा प्रचार-प्रसार करणे, ते गुण ज्यांच्यामध्ये आहेत त्यांचा जाहीर सत्कार करणे, गणपतीला जी आवडणारी क्षेत्रे आहेत- त्यापैकी एक म्हणजे रणांगण. तो स्वतः लढवय्या, देवांचा सेनापती म्हणून सैनिकी शाळा काढून तरुणपिढीतून देशासाठी उत्तम पराक्रमी असे लष्करी अधिकारी घडविले जाणे, ज्यांनी युद्धभूमीवर प्रभावी कामगिरी केली असेल अशा मंडळींचा गौरव करणे हे एकप्रकारे गणेशपूजनच आहे. तर मराठी रंगभूमीवरील त्या त्या वर्षीच्या सर्वोकृष्ट नाटकाला एक लाखाचे बक्षीस देऊन ती रक्कम त्या नाटकाशी संबंधित अशा सर्व कलाकार आणि साहाय्यकांमध्ये वाटून दिली जावी. त्यामध्ये पडद्याच्या पाठीमागे राहून काम करणार्यांनादेखील सामावून घ्यावे आणि राजकारणाशी संबंधित असे उत्तम लेखन करणारे पत्रकार, संपादक ह्यांना त्यांच्या संशोधनपर लेखनासाठी पुरस्कार देणे अशा तीन क्षेत्रांतील मान्यवरांचा, योग्य व्यक्तींचा सत्कार करावा असा माझा विचार होता. ह्या कृतीतून गणेशोपासनेच्या निमित्ताने आपण केवढे मोठे कार्य करू शकतो हे जगाला कळावे हा माझा हेतू होता आणि आहे. गणेशोपासनेला विधायक वळण लावणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी संघटित होऊन एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे सामाजिक कार्य करणे ही काळाची गरज आहे.
आडगावी एखादे रुग्णालय बांधणे, गरीब मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे, गरजू विद्यार्थ्यांची निदान त्या एका वर्षाची शैक्षणिक जबाबदारी उचलणे, मोफत वाचनालय सुरू करणे, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे भरविणे, महिलांसाठी वेगवेगळे लघुउद्योग सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून देणे, वृद्धाश्रमांना देणग्या, अनाथाश्रमांना आवश्यक वस्तू भेट म्हणून देणे, आपल्या गावात विविध उपयोगी वृक्षांची लागवड करणे, रोपवाटिका तयार करून रोपांचे मोफत वाटप करणे. विविध स्पर्धांचे आयोजन करून आपल्या विभागातील गुणी मुला-मुलीना प्रगतीची संधी मिळवून देणे, त्यांच्या कलागुणांना उत्तेजन देणे, अशी अनेक कामे करूनही गणपतीची एका वेगळ्या तर्हेची पूजा आपल्याला करता येईल.
गणपती हा महाभारत लिहिणार्या महर्षी वेदोव्यासांचा लेखनिक झाला होता. तो संदर्भ लक्षात घेऊन तरुणांना लघुलेखन कला (स्टेनोग्राफी) शिकविण्याचे वर्ग मोफत चालविले तरीही ती गणेशपूजाच ठरेल. संगणक शिक्षण आर्थिक परिस्थिती तितकीशी बरी नसलेल्यांना इच्छा असूनही परवडत नाही म्हणून घेता येत नाही. ते लक्षात घेऊन मोफत संगणक शिक्षणाची व्यवस्था करता येईल. अथवा अशा विद्यार्थ्यांना जी मदत करता येईल, ती तशी जरूर करावी.
संदर्भ टीप : प्रस्तुत लेख हा हिंदुधर्मातील पारंपरिक रूढी, परंपरा, समजुती तसेच पंचांगशास्त्र या अनुषंगाने परंतु त्याचवेळी स्वतंत्र विचारधारेने लिहिला आहे.
~ ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर
No comments:
Post a Comment