"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 78

   *❒ बराक ओबामा ❒*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
    अमेरिकेचे ४४वे राष्ट्राध्यक्ष
●जन्म ~ ४ ऑगस्ट, १९६१, होनोलुलु, हवाई, अमेरिक

.                           "बराक हुसेन ओबामा"
    हे अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जानेवारी २०, २००९ रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ४, २००८ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला. पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ६, २०१२ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉम्नी ह्यांचा ३०२ विरुद्ध २०३ मतांनी पराभव केला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते इलिनॉय ह्या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी सेनेटर जोसेफ बायडेन ह्यांची निवड केली आहे. ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो ह्या शहराचे निवासी आहेत.

     ९ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना २००९ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.

                         ◆ जन्म, लहानपण ◆
   बराक ओबामांचा जन्म अमेरिकेच्या हवाई राज्यातील होनोलुलु ह्या शहरात झाला. त्यांचे वडील बराक ओबामा सिनियर हे केन्या ह्या देशाचे नागरीक होते आणि त्यांची आई ऍन डनहम ही अमेरिकेच्या कॅन्सस ह्या राज्यातली होती. ओबामांचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया ह्या देशातील जकार्तामध्ये झाले. ते १० वर्षाचे असताना हवाईला परतले आणि त्यानंतर त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांना वाढवले. हवाईतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून राजकारणशास्त्र ह्या विषयातून १९८३ मध्ये पदवी घेतली आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या कायदा विभागातून १९९१ मध्ये उच्च पदवी घेतली. हार्वर्डमध्ये असताना ते हार्वर्ड लॉ रिव्ह्यू चे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यानंतर पुढची १२ वर्षे त्यांनी शिकागो विद्यापीठामध्ये संविधानशास्त्र शिकवले.

                       ◆ जागतिक लोकप्रियता ◆
    बराक ओबामांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या भाषणशैलीमुळे त्यांची तुलना मार्टिन ल्युथर किंग, जुनियर बरोबर केली जाते. केन्यन वडील, अमेरिकन आई, हवाईमधील जन्म, इंडोनेशियातील शिक्षण आणि आयव्ही लीग विद्यापीठांमधून उच्चशिक्षण ह्या सर्व गोष्टींमुळे ओबामांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झालर मिळाली आहे ज्यामुळे ऐतिहासिक कृष्णवर्णीय अमेरिकन राजकारण्यांच्या तुलनेत त्यांचे वेगळेपण उठून दिसते. ओबामांच्या २० जानेवारी २००९ रोजी झालेल्या वॉशिंग्टनमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला लाखो चाहत्यांनी थंडीची पर्वा न करता हजेरी लावली.

     ओबामांची लोकप्रियता केवळ अमेरिका देशापुरतीच सीमित नाही. २००८ साली बीबीसीतर्फे घेण्यात आलेल्या एका कौलामध्ये २२ देशांच्या लोकांनी (भारतासह) ओबामांना पसंती दाखवली आणि १७ देशांच्या लोकांनी ओबामा निवडून आल्यानंतर अमेरिकेचे जगातील इतर देशांशी संबंध सुधारतील असे भाकित केले होते निवडणुकीमध्ये ओबामा विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर जगभरात त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष व्यक्त केला. ओबामांचा विजय केन्यामध्ये प्रचंड धुमधडाक्यात साजरा केला गेला. केन्याच्या राष्ट्राध्यक्षांनी ह्या आनंदाप्रीत्यर्थ एका दिवसाची राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. जगात इतरत्र युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये लोकांनी ओबामांच्या विजयाचे उत्साहाने व आशेने स्वागत केले. मात्र चीनमध्ये याबाबतीत अनास्था जाणवली तर पाकिस्तानात अनेकजण याबाबतीत साशंक होते.

                           ◆ समाजकार्य ◆
     बराक ओबामांनी आपल्या शिकागो शहरातील वास्तव्यादरम्यान बराच काळ समाजसेवेत व्यतीत केला आहे. १९८५ मध्ये शिकागोच्या दक्षिण पांढरपेशा विभागात विकसनशील समाज प्रकल्प (Developing Communities Project) यासाठी त्यांची प्रमुखपदी निवड झाली. त्यापुढील ३ वर्षे त्यांनी कममिळकतीवर जगणाऱ्या गरीब समाजाच्या विकासासाठी अनेक कार्यहोता हाती घेतले.

No comments:

Post a Comment