"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 234

   *❒ नारायण श्रीपाद राजहंस ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ २६ जून, १८८८,  नागठाणे, सांगली, महाराष्ट्र
●मृत्यू :~ १५ जुलै, १९६७

                        ★नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, ★

    या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.

       रंगभूमीवरील आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत नाट्यप्रेमींना आपल्या मोहात पडणा-या या नटसम्राटाचा जन्म २६ जून १८८८ ला पुण्यात झाला. त्याचे आजोबा कृष्णाजीपंत यांना पाच अपत्य होती. त्याचे मुळगाव नागोठाणे, सातारा हे होय. श्रीपादरावांचा विवाह अन्नपूर्णाबाई यांच्याशी झाल्यानंतर त्यांना पुढे सात अपत्य झाली पण ती अल्पायुषी ठरली असल्याने नारायण रावांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील चिंताग्रस्त होते. श्रीपादराव हे स्वतः सतारवादक होते. शिवाय सरकारी खात्यात नोकरीला असल्यामुळे घरची परिस्थिती संपन्न होती. त्या काळात नाटकाचा बोलबाला असल्याने बालपणीच नारायणवर संगीत कलेचे संस्कार रुजले. आपली भावंडे शंकर, वेणू, व व्यंकटेश झोपी गेली असतानाही नारायण मात्र नाटक संपेपर्यंत विस्फारलेल्या नजरेने बघत असत.

                         ★ कारकीर्द ★
    बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. नारायणाची संगीतातील रुची पाहून वडलांनी त्यास शिक्षणासाठी बहिणीच्या मुलीकडे पाठवले. तिथे मेहबूब खॉं यांच्याकडे गायनाचे सुरुवातीचे धडे गिरवले. याच काळात काका यशवंत यांच्याकडे सहज म्हणून पुण्याला फिरण्यासाठी गेले असता ‘ केसरी ‘ या वर्तमानपत्राकडून गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. काका वर्तमानपत्रात काम करत असल्याने नारायणास तिथे जाण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात गायलेल्या ‘ हरवा मोरा देव बंधवा ‘, ‘ ना तर मै गारी दुंगी, ना रहुंगी तुम्हीसो बलमा’ हे गीत गायल्यानंतर लोकमान्यांनी त्यास ‘ बालगंधर्व ‘ ही पदवी बहाल केली. केसरीच्या पहिल्या पानावर झळकत नारायण संपूर्ण महाराष्ट्रभर ‘ बालगंधर्व’ नावाने प्रसिद्ध झाले.
बालगंधर्व म्हणजे रेखीव रूप, अत्यंत मधुर आवाज, सरस अभिनय! त्यांचे गाणे म्हणजे ताल-लयीचा अत्यंत पक्केपणा, सुरांचा लडिवाळपणा आणि स्त्रीसुलभ नाजूक आविष्कार! नारायणरावांच्या गाण्यांनी भले भले गवई प्रभावित झाले. अल्लादिया खांनीसुद्धा आनंदाश्रूंनी नारायणरावांना दाद दिली. भास्करबुवांनी त्यांच्याकडून ‘रुक्मिणी स्वयंवरा‘ची गाणी बसवून घेतली.या काळातच ‘ किर्लोस्कर नाटक कंपनीत ‘ नशीब अजमावण्यास गेलेल्या ‘ बालगंधर्वास ‘ अपयश आले. त्यांनतर ताहराबादकर गुरुजी व कोल्हापूरचे अपय्यबुवाकडे संगीतकलेचे ज्ञान संपादन केले. पुढे १९०५ च्या दरम्यान ‘ किर्लोस्कर कंपनीत ‘ , ‘शकुंतला’ च्या स्त्री रूपातील भूमिकेतून नाट्यविश्वातील एका नाटकीय कारकीर्दीचा ‘श्री गणेशा’ केला..
१९०५ मध्ये त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्यांची शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. स्त्री भूमिका करताना अभिनयक्षमता, अचूक निरीक्षण व सौंदर्यदृष्टी असल्यामुळे स्त्री मनाचे सूक्ष्म भाव सहजपणे प्रकट करण्यात ते यशस्वी झाले. शकुंतला ते सिंधूपर्यंत त्यांच्या स्त्री भूमिकांमध्ये विविधता होती. त्यांच्या वेशभूषा व अलंकारांचे अनुकरण त्या काळातील स्त्रियाही करत असत.
कारकीर्दीच्या सुरूवातीस आई , दत्तुमामा व शंकरराव यांच्या आग्रहास्तव इच्छा नसतांनाही पारगावच्या लक्ष्मीबाई हिच्याशी १९०७ साली विवाह केला. त्यांनतर पुढील काळात लक्ष्मीबाईला ‘इंदू’ नावाची मुलगी झाली.परंतु ती आजाराने दगावली असतानाही या नटसम्राटाने नारायणाची झळ ‘ मनापनातील ‘ भामिनीला का? म्हणून त्यांनी खेळ बंद न करता भामिनीची भूमिका करून नाटकाप्रती आपली निष्ठा जपली. कारकिर्दीला बहर येत असतांना १९११ साली नानासाहेब जोगळेकरांच्या निधनानंतर कंपनीत शंकरराव व इतर मंडळीत झालेल्या मतभेदातून गणपतराव बोडस , गोविंदराव टेंबे व पंडित या मित्राच्या पुढाकाराने किर्लोस्कर नाटक कंपनीतून बाहेर पडत १९ जुने १९१३ साली ‘ गंधर्व संगीत मंडळी ‘ ची स्थापना केली. त्यानंतर ३ सप्टेंबर १९१३ साली ‘मूकनायक ‘ हे नाटक करून गंधर्वयुगाची सुरुवात केली. त्यानंतर संगीत शकुंतला, संगीत मानापमान , संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटीक , संगीत संशय कल्लोळ , संगीत शारदा , संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत एकाच प्याला अशा विविध नाटकातील स्त्रीच्या भूमिकेतून रंगभूमीवर अजरामर भूमिका केल्या. आपल्या २१

       कुठल्याही व्यवसायात आवश्यक असणारा काटेकोरपणा वा दक्षता त्यांच्यात नसल्यामुळे ह्या अत्यंत लोकप्रिय आणि श्रेष्ठ दर्जाच्या कलावंताला १९२१ साली दीडलाख रुपयांचे कर्ज झाले. ते सव्याज फेडण्यासाठी १९२७ अखेरपर्यंत सतत कष्ट करून, सावकारांना पावणेतीन लाख रुपये द्यावे लागले. ज्यावेळी त्या कर्जाची वाच्यता झाली, त्यावेळी मुंबईतील त्यांच्या हितचिंतकांनी दीड लाख रुपयांची देणगी जमविली; परंतु ती स्वीकारण्याचे बालगंधर्वांनी नाकारले. नेहमी चेह-यावर शांत भाव व स्मित हास्य असणा-या बालगंधर्वाचा अर्धांगवायूच्या झटक्याने वयाच्या ७९ व्या वर्षी, १९६७ साली निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्यविश्वातील सुवर्णयुगाची अर्थातच गंधर्व युगाची समाप्ती झाली.

       १९५२ साली त्यांच्या एका पायात अधूपणा निर्माण होऊन अखेर त्यांचे दोन्ही पाय पंगू झाले. एका जागेवरून त्यांना अखेरच्या काळात उचलून ठेवावे लागत असले, तरी बालगंधर्व प्रसन्न मनाने गात होते आणि त्यांचे गाणे ऐकायला गर्दी जमतच होती. ९ एप्रिल १९६७ रोजी मानसिक ग्लानीमुळे त्यांची शुद्ध हरपली. त्याच अवस्थेत असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला सह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. त्यांची संगीत शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. इ.स. १९५५ रोजी त्यांनी एकच प्याला नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली.

                      ★ बालगंधर्व (चित्रपट) ★

     बालगंधर्व हा इ.स. २०११ साली पडद्यावर झळकलेला, व नितिन चंद्रकांत देसाई याने निर्माण केलेला मराठी चित्रपट आहे. मराठी रंगभूमीवर इ.स.च्या २०व्या शतकात अतिशय लोकप्रिय ठरलेले गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. सुबोध भावे याने या चित्रपटात बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ६ मे, इ.स. २०११ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला.

                     ★ वारसा ★
       इ.स. १९६८ साली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह त्यांचे स्मृतिमंदिर तयार केले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी यात पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्‌घाटन आचार्य अत्रे यांनी केले. खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्या हस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झाले होते.

                 ★ इतिहास घडविणारे नाटक ★

खाडिलकरांच्या मानापमानाचा पहिला प्रयोग १९११मध्ये झाला आणि या नाटकाने नवा इतिहास घडवला. खाडिलकरांनी प्रथमच नाटकासाठी पदे लिहिली. संगीत दिग्दर्शक हे नवीन पद, काम तयार झाले. पहिले रोमॅंटिक संगीत नाटक रंगभूमीवर आले. त्यातील भामिनीची भूमिका बालगंधर्वांनी स्वत:च्या पद्धतीने परिणामकारक केली आणि रंगभूमीवर आपले स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. तेथपासून त्यांचं व्यावसायिक जीवन वेगवेगळी वळणं घेत गेलं, त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात चढउतार येत राहिले आणि स्वाभाविकपणे ते एकमेकांवर परिणाम करीत राहिले.
प्रेक्षकांना मायबाप मानणार्‍या बालगंधर्वांनी गंधर्व नाटकमंडळींद्वारे प्रेक्षकांसमोर अधिकाधिक उत्तम प्रकारचा अभिनय व गाणं यांचं दर्शन घडवलं. राजस रूपसंपदा, गाण्यातील नवनवोन्मेषशाली सौंदर्य आणि कलात्मक अभिनयशैली या गुणत्रयीच्या जोरावर त्यांनी सर्व स्तरांतील प्रेक्षकवर्ग जिंकला.

No comments:

Post a Comment