"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 162

*❒भाऊराव पायगौंडा पाटील❒*
   
   *शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण*

●जन्म :~ २२ सप्टेंबर १८८७,  कुंभोज, महाराष्ट्र
●मृत्यू :~ ९ मे  १९५९
◆पेशा :~ शिक्षण प्रसार

                         ◆ कर्मवीर भाऊराव पाटील ◆
     हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.

      रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी जैन कुटूंबात झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.

                         ◆रयत शिक्षण संस्था◆
पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.

    महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली. 

No comments:

Post a Comment