81. *❒ गोपाळ कृष्ण गोखले ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ९ मे १८६६●मृत्यू :~ १९ फेब्रुवारी १९१५
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले.
भारतामधील ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारत सेवक समाज या संघटनांचे ते आघाडीचे नेते होते.
भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते.
गोखलेंना मवाळवादाचा राजकारण मान्य होते. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातीव्यवस्था निर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या माध्यमातून समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशाप्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या. इ.स. १९०२ साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना इ.स. १९१९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले. त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले.
भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत.
‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे , असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले. संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे निधन १९ फेब्रुवारी १९१५ ला झाले .
●~~●~~●~~◆~~●~~●~~●
●~~●~~●~~◆~~●~~●~~●
No comments:
Post a Comment