"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

December 01, 2024

26/11 मुंबई दहशतवादी हल्ला

   

  26/11 अर्थात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असा भ्याड हल्ला होता, जो मुंबईची ओळख बनू पाहत असला तरी मुंबईला कधीच ती आपली ओळख बनू द्यायची नव्हती.

   या घटनेला इतकी वर्षं उलटली, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी जिवंत आहेत.

   लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता.

   सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले. 26 नोव्हेंबर 2008 च्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली.


    हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं.

हा हल्ला इतका मोठा असेल याचा कोणालाही अंदाज आला नव्हता.


    मुंबईवरील दहशतवादी हल्ला ही तमाम भारतीयांसाठी कधीही न विसरता येणारी घटना आहे. प्रत्येक वेळी जेव्हा या हल्ल्याचा उल्लेख होतो तेव्हा अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणीं सोबतच नवीन माहितीचीही भर पडत असते. समुद्रमार्गे आलेल्या दहा दहशतवाद्यांनी २६ ते २८ नोव्हेंबर २००८ या तीन दिवसांत मुंबईतील महत्त्वाच्या स्थळांवर घडवलेला नरसंहार स्मृतिपटलाच्या आड कधीही करता येणार नाही. २६ नोव्हेंबरचा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. तसेच मुंबई पोलिस दलातील १४ पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. अशोक कामटे, हेमंत करकरे, संदीप उन्नीकृष्णन, विजय साळस्कर,  तुकाराम ओंबळे, बापूराव धुरगुडे, जयवंत पाटील हे शहिद झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.
पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला. परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले. या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या. या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या शूर अधिकाऱ्यांना, पोलीसांना आणि या हल्ल्यात हकनाक बळी पडलेल्या सर्व निष्पाप जीवांना भावपूर्ण आदरांजली.

No comments:

Post a Comment